
मौजे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) येथे दि 09/02/2026 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी पहिल्या सत्रात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. या प्रसंगी भंते यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करत त्यांच्या त्याग, संघर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील मोलाच्या योगदानावर प्रकाश टाकला.

दुसऱ्या सत्रात समाजहिताची भावना जपत भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमातून सामाजिक एकोपा व मानवतेचा संदेश देण्यात आला.
त्यानंतर तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भिमशाहीर राजरत्न कंधारकर तसेच संच नांदेड यांच्या सादरीकरणातून बुद्धगीत व भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.