
हिंगोली : कळमनुरी येथील विश्रामगृहासमोर (रेस्ट हाऊस) असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात घुसून, तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर तीन अज्ञात इसमांनी सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजू कांबळे हे थोडक्यात बचावले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.⋅
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राजू कांबळे हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात एकटेच बसले होते. यावेळी काळ्या कपड्यांमध्ये आलेले आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक कार्यालयात प्रवेश केला. आत शिरताच त्यांनी प्रथम कांबळे यांचा मोबाईल बाजूला फेकून दिला आणि त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

बंदूक आणि चाकूचा वापर
हल्लेखोरांपैकी एकाकडे बंदूक तर दुसऱ्याकडे तीक्ष्ण चाकू होता. हल्लेखोराने बंदूक काढून कांबळे यांच्यावर रोखली आणि गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कांबळे यांनी प्रसंगावधान राखून हल्लेखोराचा हात झटकला, ज्यामुळे बंदूक खाली पडली. त्यानंतर दुसऱ्याने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, तोही त्यांनी रोखून धरला.
आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळाले
राजू कांबळे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले. लोकांचा आवाज ऐकताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या ‘व्हेरना’ (Verna) गाडीतून आले होते. त्यांनी गाडीची नंबर प्लेट झाकली होती. माझ्यावर हा पूर्वनियोजित जीवघेणा हल्ला करण्यात आला, अशी माहिती राजू कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सध्या राजू कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोर कोण होते आणि या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.