ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमातून MIT विश्वशांती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचा अनुभव.


*प्रतिनीधी:- सागरभाऊ लोंढे (उपसंपादक)*
रुई :डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने श्री. बाबीर विद्यालय, रुई येथे ‘ग्रामीण तादात्म्य कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. बुधवार, ३० सप्टेंबर ते शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात विद्यापीठातील रोबोटिक्स आणि ऑटोमेशन शाखेच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यासाठी त्यांनी रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील तसेच संतोष पांढरमीसे, अनिल कांबळे आणि इतर ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांची राहण्याची व इतर सर्व सोय केली.

यासाठी सर्व सोयी सुविधा दिल्याबद्दल त्यांच्या तर्फे
शाल व सुंदर प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना व पुढाकार विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड सर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला. ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमाचे एकूण समन्वयक डॉ. अजित देवरे असून, रुई येथील कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. अरुण माळी, प्रा. स्नेहल कोळेकर आणि प्रा. मितुल सोलंकी यांनी मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्याशी अनेक विषयावर संवाद साधला.


कार्यक्रमादरम्यान अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी श्री. बाबीर विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून तंत्रज्ञान, रोबोटिक्स, भविष्यातील शिक्षणाच्या संधी, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगांबाबत मार्गदर्शन केले. संवादात्मक उपक्रम व चर्चांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्याशी अनेक विषयावर संवाद साधला.
सामाजिक जागृतीचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि मशाल फेरी आयोजित केली. स्वच्छता, आरोग्य, सामाजिक जबाबदारी आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी श्रमदान करून श्री. बाबीर देवस्थान, रुई येथे स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे सामाजिक बांधिलकीचा अनुभव घेतला.
यासोबतच विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामीण पातळीवरील विविध प्रत्यक्ष समस्या जाणून घेतल्या. गावातील दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या आणि स्थानिक गरजा समजून घेत त्यावर अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपाय कसे विकसित करता येतील, याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.
ग्रामीण तादात्म्य कार्यक्रम हा डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्कृतीचा अनिवार्य भाग आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची प्रत्यक्ष जाणीव करून देणे आणि त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा व अनुभवाधारित शिक्षणाचा उपयोग समाजातील समस्या सोडविण्यासाठी करण्याची संधी देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, नवकल्पनाशक्ती आणि जबाबदार अभियंता म्हणून कार्य करण्याची भावना विकसित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!