
स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे आविष्कार २०२६ मध्ये घवघवीत यश
जयदीप पंडित व संस्कृती घारे यांचा प्रथम क्रमांक; भक्ती खराबे हिची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड
परतूर प्रतिनिधी : भीमचंद्र दामोधर प्रधान
मंठा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आविष्कार २०२६’ स्पर्धेत स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप पाडली.

इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विभागात महाविद्यालयाचा विद्यार्थी जयदीप पंडित याने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला या विभागात संस्कृती घारे हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. शेतकी आणि पशुसंवर्धन विभागात कु. भक्ती खराबे हिने उत्कृष्ट सहभाग नोंदवत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नवोपक्रमशीलता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले आहे.
या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे आविष्कार समन्वयक प्रा. डॉ. जितेंद्र जगताप यांच्यासह प्रा. डॉ. भरत धोत्रे, प्रा. डॉ. राजेंद्र काकडे, प्रा. डॉ. राजेश गायकवाड, प्रा. डॉ. दीपमाला गायकवाड, प्रा. डॉ. दक्षता देशमुख, प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, प्रा. डॉ. विशाल अवसरमोल, प्रा. डॉ. किशनसिंग गहिलोद आणि प्रा. डॉ. राजेंद्र उधाण यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य व प्रोत्साहन विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे भविष्यातील संशोधन व नवोपक्रमासाठी त्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, महाविद्यालयाच्या प्रगतीच्या वाटचालीत या यशाची निश्चितच महत्त्वपूर्ण भर पडली आहे.