
हिंगोली : दिनांक 4 मे रोजी सेनगाव तालुक्यातील वाढोना येथील तक्षशिला बौद्ध विहारात भगवान बुद्धांच्या सुमारे १५ फूट उंचीच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करून काही भाग जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विहारातील भंते बुद्धकिर्ती हे मुंबई येथे असताना हा प्रकार घडला. आज सकाळी उपासक वंदनासाठी विहारात गेले असता ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांत गुन्हा दाखल केला. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हेही उपस्थित होते.

रिपब्लिकन सेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून, संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडेंनी दिला आहे.




