अखेर आमदार सौ.सुलभा गायकवाड यांनी विधानसभेत बुद्ध भूमीच्या जमिनीचा मुद्दा केला उपस्थित



कल्याण प्रतिनिधी |

कल्याण कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील वादग्रस्त बुद्ध भूमीच्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पोहोचला असून कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी अखेर हा विषय औचित्याचा मुद्दा म्हणून सभागृहात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आमदार सुलभाताई गायकवाड यांनी बुद्ध भूमीच्या जमिनीसंदर्भातील वाद स्थानिक नागरिकांच्या भावना तसेच या प्रकरणात शासनाने लक्ष घालण्याची गरज अधोरेखित केली. मात्र, हा विषय औचित्याचा मुद्दा म्हणून मांडण्यात आल्याने त्यावर सभागृहात शासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही किंवा सविस्तर चर्चा झाली नाही.

दरम्यान या प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि बुद्ध भूमीच्या जमिनीच्या हक्कासंदर्भासह अन्य वादावर न्याय्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा बुद्ध भूमी समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हा विषय केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता आता विधानसभेपर्यंत पोहोचल्याने संबंधित नागरिकांमध्येही पुढील घडामोडींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, बुद्ध भूमीच्या मागण्यांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर २९ जुन रोजी नेण्यात आलेल्या महा आक्रोश मोर्चा नंतरही प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने पालिका मुख्यालया समोर सुरू असलेले साखळी उपोषण आजही सुरूच ठेवण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बुद्ध भूमीच्या जमिनीच्या हक्कासंदर्भातील प्रलंबित प्रश्नावर शासनाने आणि प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घेऊन न्याय्य निर्णय करावा.

आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी विविध मार्गांनी आपल्या मागण्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविल्याचा दावा केला असून, त्यानंतरही प्रश्न प्रलंबित असल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विधानसभेत हा विषय उपस्थित झाल्यानंतर शासन पुढे कोणती भूमिका घेते आणि या प्रश्नावर कोणती कार्यवाही होते, याकडे बुद्ध भूमी समर्थकांसह कल्याण पूर्वातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!