
हिंगोली (दि. ४ डिसेंबर) : स्वाधार योजनेच्या 2025-26 साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांना अडथळे येत असून, फॉर्म सबमिट होत नसल्याने व यंत्रणा काम करत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने मा. सहाय्यक आयुक्त, न्याय विभाग हिंगोली यांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी योजनेत अर्ज भरलेल्या व यंदा त्यांचे हॉस्टेल मंजूर झालेले असताना, या विद्यार्थ्यांना यंदा फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे व सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे.
या संदर्भात तातडीने उपाययोजना करून ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी योगेश नरवाडे जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी,राजरत्न बगाटे कामगार युनियन प्रभारी, यशवंत गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.




