कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०२६ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित ८८ वी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उत्साहात पार पडली. पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात संवाद फाउंडेशन प्रस्तुत ‘युगक्रांती शाहिरी जलशा’ यांना विशेष स्थान मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस. एस. देशमुख यांचा समावेश होता. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर, पत्रकार आणि निमंत्रित उपस्थित होते.
या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील महत्त्वाचे नाव असलेले पत्रकार विशाल परदेशी यांनी युगक्रांती शाहिरी जलशाची ओळख करून दिली. त्यांच्या माध्यमातून पत्रकारिता आणि शाहिरी या दोन्ही प्रभावी अभिव्यक्ती माध्यमांचा संगम उपस्थितांसमोर आला.

पत्रकारिता समाजातील प्रश्नांना वाचा फोडते, तर शाहिरी गीत, कविता आणि कलात्मक सादरीकरणातून सामाजिक वास्तव मांडत जनजागृती करते. या दोन्ही माध्यमांचे सामाजिक महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले.
‘युगक्रांती शाहिरी जलशा’च्या माध्यमातून संविधानिक मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते. शाहिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पत्रकारिता आणि समाजप्रबोधन यांच्यातील परस्परपूरक नाते अधोरेखित करणारा हा कार्यक्रम ठरला.
शाहीर आकाश पवार यांनी आपल्या नव्या गाण्यांच्या मांडणी मधून खऱ्या अर्थाने वर्तमान परिस्थिती वर भाष्य केले शाहिरा ऐश्वर्या जाधव पवार यांनी आपल्या गाण्यातून महिलांची व्यथा मांडली तसेच मुक्तीची गीत सादर केली, गायक धनंजय काकडे यांनी उत्तम अशी गाण्याच्या माध्यमातून मांडणी करत जालशाला साथ दिली, वादक अर्जुन येरबागे, संतोष चंदनशिवे, सुशील गायकवाड यांनी मोलाचे योगदान जालशाला दिले.

संवाद फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या युगक्रांती शाहिरी जलशाला या महत्त्वाच्या व्यासपीठावर स्थान मिळाल्याने शाहिरी कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार व्यापक स्तरावर पोहोचवण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली.
पत्रकारितेचा निर्भीड आवाज आणि शाहिरीचा प्रबोधनकारी हुंकार लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा आहे, हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

