खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन


 

नांदेड : नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथे अल्पवयीन व दिव्यांग बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आज पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली तसेच न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी खोब्रागडे नगर येथे अल्पवयीन व दिव्यांग बालिकेवर गंभीर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी अंजलीताई आंबेडकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील महिला नगरसेविका, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने नांदेडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले होते. प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व जलदगतीने पूर्ण करावा, उपलब्ध पुरावे सुरक्षितपणे संकलित करून दोषारोपपत्र तातडीने दाखल करावे, तसेच पीडित बालिका व तिच्या कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय, मानसिक, कायदेशीर आणि शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती.

 

तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी आणि पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. यावर पीडित कुटुंबाच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात येईल तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली होती.

 

पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


Leave a Comment

error: Content is protected !!