जायकवाडी वसाहतीत पंचशील ध्वज व बौद्ध विहाराच्या जागेसाठी आमरण उपोषण सुरूच; पाचव्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस निर्णय नाही


लोहा | प्रतिनिधी

लोहा शहरातील जायकवाडी वसाहत, पंचशील नगर येथे पंचशील ध्वज व बौद्ध विहाराच्या जागेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी लढवय्ये भीम योद्धा ॲड. पंचशिल दादा कांबळे मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. घरदार आणि मुलाबाळांना सोडून सुरू असलेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

ॲड. कांबळे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यासह लोहा-कंधार तालुक्यातील शेकडो भीमसैनिक दररोज आंदोलनस्थळी उपस्थित राहत असून, तेथे पहारा देत आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

मात्र, पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देतात; मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

“प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित मागण्या लवकरात लवकर मान्य करून उपोषण सोडवावे,” अशी मागणी भास्कर केशवराव कदम शेकापूरकर यांनी केली आहे.

तसेच, प्रशासन हे जनतेचे सेवक असून स्थानिक राजकीय दबावामुळे निर्णय घेण्यास विलंब होत असेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास नांदेड जिल्ह्यातील तसेच लोहा-कंधार तालुक्यातील भीमसैनिक पुढील भूमिका काय घेतील, हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

तालुका दंडाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून चर्चा व समन्वयातून तोडगा काढावा, अशी पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आहे


Leave a Comment

error: Content is protected !!