लोहा प्रतिनिधी : जायकवाडी कॅम्प येथील विश्वशांती बौद्ध विहारामधील पंचशील ध्वज पुनर्स्थापित करण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या उद्देशाने लोहा-कंधार मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध आंबेडकरी संघटना, पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता क्रांतीसूर्य बौद्ध विहार, आंबेडकर नगर, लोहा येथे पार पडणार आहे. जायकवाडी कॅम्प येथील विश्वशांती बौद्ध विहारामध्ये पंचशील ध्वज पुन्हा सन्मानाने फडकविण्यासाठी आणि त्यासंदर्भातील आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीस लोहा-कंधार मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, विविध आंबेडकरी पक्षांचे प्रतिनिधी, बौद्ध उपासक-उपासिका तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष पी. एम. वाघमारे (बापू) तसेच माजी नगरसेवक पंचशील कांबळे यांनी केले आहे.
पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू असलेल्या संघर्षाला व्यापक जनसमर्थन मिळावे आणि पुढील आंदोलन अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे, यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.




