
पाथरी | प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम पूर्ण करूनही अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप हप्ते मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत संतप्त लाभार्थ्यांनी पंचायत समिती पाथरी येथे तक्रार अर्ज सादर केला आहे.
लाभार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी घरकुलाचे बांधकाम नियमानुसार पूर्ण केले असताना त्यांच्या खात्यावर हप्ते जमा झालेले नाहीत. मात्र, काही ठरावीक लाभार्थ्यांचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्यामुळे त्यांचे हप्ते प्राधान्याने वितरीत केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच निवडणुकीच्या काळात काही राजकीय नेत्यांकडून “घरकुलाचे हप्ते मिळवून देऊ, आम्हाला मतदान करा” अशी भूलथाप देऊन लाभार्थ्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने कोणताही पक्षपात न करता, पारदर्शक पद्धतीने आणि राजकीय दबावाला बळी न पडता रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्व प्रलंबित हप्ते तात्काळ वितरीत करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे