बाजारपेठ बंद करण्याची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी


श्रीरामपूर : शहरातील बाजारपेठ रात्री १० वाजता बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून बाजारपेठ बंद करण्याची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी श्रीरामपूर शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर *शहराध्यक्ष मा. ओमभैय्या त्रिभुवन* यांच्या नेतृत्वाखाली, तसेच *जिल्हामहासचिव मा. सुनिल वाघमारे* यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलिसांना देण्यात आले.

 

श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहराची बाजारपेठ रात्री १० वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे व्यापारी, दुकानदार तसेच ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता असून, बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

दिवसभर व्यवसायात व्यस्त असलेले व्यापारी रात्री आपला व्यवसाय बंद केल्यानंतर कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी बाहेर पडतात. अशावेळी कुटुंबासोबत जेवण, नाश्ता किंवा इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा असते. मात्र रात्री १० वाजता सर्व स्टॉल व दुकाने बंद होत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊन त्यांच्या आनंदावर विरजण पडते, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

शहरातील अनेक व्यापारी व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराच्या दृष्टीने रात्रीची वेळ महत्त्वाची आहे. कामानिमित्त दिवसभर बाहेर असणारे नागरिक तसेच विविध कारणांमुळे उशिरा खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री १० वाजताची बाजारपेठ बंद करण्याची वेळ अडचणीची ठरू शकते.

 

त्यामुळे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बाजारपेठ बंद करण्याची वेळ रात्री १० ऐवजी रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

 

पोलीस प्रशासनाने सदर निर्णयाचा पुनर्विचार करून व्यापारी व नागरिकांना दिलासा द्यावा आणि बाजारपेठ रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

या निवेदनावर विलास अहिरे, शाम शिरसाठ, दीपक पवार, आकाश पंडित, नारंग साहेब, जेद खान, रेहान शेख, अजय चुनिरिया आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Leave a Comment

error: Content is protected !!