
उस्माननगर : शेरे-ए-हिंद हजरत टीपू सुलतान यांच्या 275 व्या जयंतीनिमित्त मौजे उस्माननगर येथील सामाजिक युवकांनी एकत्र येऊन 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
टीपू सुलतान यांच्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेला वंदन करण्याच्या हेतूने आयोजित या उपक्रमासाठी गावातील नागरिक, युवक मंडळे व सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रक्तदान करून समाजसेवेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी सर्वांना केले आहे.
शिबिरासाठी अनुभवी डॉक्टरांचे पथक उपस्थित राहणार असून रक्तदात्यांना प्रमाणपत्रे व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमातून जमा होणारे रक्त अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
टीपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेली ही सामाजिक सेवा उपक्रमाची परंपरा समाजात बंधुत्व, ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणारी ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.