
कंधार :ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेऊन संविधानिक मूल्यांचा प्रचार, वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज आणि युवकांमध्ये सामाजिक भान जागविण्याचे कार्य करणारे घोडज (ता. कंधार) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रूपेश कांबळे यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार–२०२६’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन नांदेड येथे झालेल्या सोहळ्यात अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक कार्य हे केवळ घोषणांपुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजात परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. समाजातील अन्यायाविरोधात भूमिका, शिक्षणाविषयी जनजागृती, संविधान विचारांचा प्रसार, फुले-शाहू-आंबेडकरांच्या समतावादी विचारांची मांडणी आणि ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक चळवळीशी जोडण्याच्या कार्यामुळे रूपेश कांबळे यांची निवड करण्यात आली.
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या निवड समितीने सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा आढावा घेत ही निवड जाहीर केली. संस्थापक बा.रा. वाघमारे, प्रदेशाध्यक्ष डी.एस. वाघमारे आणि जिल्हाध्यक्ष नामदेव कांबळे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रूपेश कांबळे यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक प्रश्नांबाबत जागृत करण्यासाठी विविध अभियानांत सक्रिय सहभाग घेतला. सामाजिक समता, संविधानिक हक्क, शिक्षण आणि परिवर्तनवादी विचारांची रुजवण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल ही कंधार तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर रूपेश कांबळे यांनी हा सन्मान समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संघटना, युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
*’गावातून सुरू झालेला प्रवास… राज्यस्तरीय सन्मानापर्यंत’….
घोडजसारख्या ग्रामीण भागातून सामाजिक कार्याची सुरुवात करून राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत पोहोचलेले रूपेश कांबळे हे आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना हा पुरस्कार नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.