
प्रतिनिधी धम्मानंद कांबळे
उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड)
संविधान गौरव दिनानिमित्त मौजे उस्माननगर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना देत संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर, समाजबांधव व युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात भारतीय संविधानाचे महत्व सांगण्यात आले. “समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय” या संविधानिक मूल्यांचे आजच्या काळातील महत्व या प्रसंगी उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच भारतीय लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी संविधानाचे पालन करण्याचा संकल्प घेण्यात आला. उपस्थित वक्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन करून युवकांनी संविधानाची जाणीव ठेवावी, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास उस्माननगर परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.