
नाशिक : डोंगराळे गावात अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबीयांशी बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवर संवाद साधून सांत्वन केले. गावात काही दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे.
आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने मालेगावातील डोंगराळे येथील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांनी दिले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनद्वारे पीडित पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून सांत्वन केले. त्यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली आणि पक्षाकडून पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. पीडितांना न्याय मिळेपर्यंत पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कोअर कमिटी सदस्य आणि सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप, कैलास लोहार, संदीप महिरे, युवराज मगरे, दीपक उशीरे, सचिन अहिरे, शशिकांत पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.