ओबीसी आरक्षण धोक्यात; खाजगीकरणामुळे शिक्षण-नोकरीतील आरक्षण धोखा – ॲड. प्रकाश आंबेडकर



​नांदेड: ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज नांदेड येथे भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामोर्चात, ओबीसी नेत्यांनी आरक्षण संकटावर गंभीर चिंता व्यक्त करत भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली.

​

खाजगीकरणामुळे आरक्षण संपुष्टात
​ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना, ओबीसी आरक्षणावर आलेल्या संकटाचे मूळ कारण स्पष्ट केले.
​शिक्षण आणि नोकरी: “आज शिक्षणातले आरक्षण हे संपले आहे. नोकरीतले आरक्षण संपले आहे. कारण शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण केले आहे आणि नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने दिल्या जात आहेत,” असे आंबेडकर म्हणाले.


​आरक्षणाची मर्यादा: त्यांच्या मते, आता जे आरक्षण उरले आहे, ते केवळ स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगर पालिका) पुरतेच मर्यादित राहिले आहे.

​’धर्म नव्हे, आरक्षण संकटात’: भाजपवर टीका करताना ते म्हणाले, “भाजप म्हणत आहे धर्म संकटात आहे, पण ओबीसींनो समजून घ्या, धर्म संकटात नाही तर ओबीसींचे आरक्षण संकटात आहे.”

​ मंडल क्रांतीची आठवण

​ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाचा दाखला दिला. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी १९९० मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या, तेव्हा आलेल्या सामाजिक न्यायाच्या क्रांतीकारी लाटेची त्यांनी आठवण करून दिली. आज पुन्हा एकदा तशाच लाटेची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

​ ‘भाजपने पाठीत खंजीर खुपसला’

​ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी भाजप आणि महायुतीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला.
​”ज्या प्रकारे बाहुबली चित्रपटात कटप्पाने पाठीत खंजीर खुपसून बाहुबलीचा जीव घेतला. त्याचप्रमाणे बहुसंख्य ओबीसी जो बाहुबली आहे, त्याच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला.”
​भोसीकर यांनी ओबीसी समाजाला आपले राजकीय शत्रू ओळखण्याचे आवाहन केले. “आपला शत्रू भाजप, महायुती आणि प्रस्थापित पक्ष आहेत, हे ओबीसींनी ओळखावे,” असे ते म्हणाले.
​या महामोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि ओबीसीच्या विविध समाजांतील हजारो साथीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेडमधील या एल्गार मोर्चातून ओबीसी समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!