
नांदेड, दि. १९ (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अॅड. पंचशील विक्रमराव कांबळे यांना बजावण्यात आलेली हद्दपारीची नोटीस राजकीय दबावातून आणि लोहा तालुक्यातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वज प्रकरणाचा राग मनात धरून काढण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. सदर नोटीस रद्द करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून

अॅड. पंचशील कांबळे यांच्यावरील प्रस्तावित हद्दपारीच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
निवेदनानुसार, अॅड. पंचशील कांबळे हे आंबेडकरनगर, लोहा येथील रहिवासी असून बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. त्यांच्याविरुद्ध केवळ दोन गुन्हे दाखल असल्याचे नमूद करत, अशा परिस्थितीत हद्दपारीसारखी कठोर कारवाई प्रस्तावित करण्यामागील कारणांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संदर्भीय प्रस्ताव क्र. पवशा-१/हद्दपार-नोटीस/पंचशील कांबळे/२०२६, दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ अन्वये त्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात सामाजिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित केली जात असताना, अन्य गंभीर प्रकरणांतील कारवाईबाबतही समान निकष लागू केले जात आहेत का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाच्या प्रश्नावरून अॅड. कांबळे यांना लक्ष्य केले जात आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या
१. अॅड. पंचशील कांबळे यांच्यावरील प्रस्तावित हद्दपारीच्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी.
२. जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वज प्रकरणाचा हद्दपारीच्या प्रस्तावाशी काही संबंध आहे का, याची सखोल तपासणी करावी.
३. संबंधित प्रकरणातील पुरावे, वस्तुस्थिती आणि कायदेशीर निकष तपासून हद्दपारीची नोटीस रद्द करावी.
४. कंधार-लोहा मतदारसंघात कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकरणांत समान निकष लागू करावेत.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय्य निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आणि पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर स्वाक्षरी करणारे पदाधिकारी

इंजि. प्रशांत इंगोले (राज्य सदस्य), अविनाश भोसीकर, डॉ. संघरत्न कुरे (माजी मराठवाडा सदस्य), अक्षय बनसोडे (युवा प्रदेश सदस्य), कैलास वाघमारे (राज्य प्रवक्ता संपर्क), शंकर महाजन (जिल्हाध्यक्ष, दक्षिण नांदेड), इंजि. राज अटकोरे (जिल्हाध्यक्ष, उत्तर नांदेड), रवि पंडित (जिल्हा महासचिव, दक्षिण नांदेड), अरुण भद्रे (जिल्हाउपाध्यक्ष,), शेख बिलाल (नगरसेवक, नांदेड-वाघाळा महानगरपालिका), संजय टिके (जिल्हा संघटक), राहुल सोनसळे (नगरसेवक), रंगनाथ गजले (जिल्हा सचिव), गौतम डुमणे (जिल्हा सदस्य), नामदेव बुद्धे, छगन हाटकर, चंद्रप्रकाश जोधळे, करण साबळे, के. पी. वने, राम कांबळे, सय्यद रिझवान, सुभाष जाधव आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.