
नांदेड | प्रतिनिधी
नांदेड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नांदेड शहरात व्यापक प्रचार दौरा केला. बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी हा प्रचार दौरा शहरातील विविध प्रभागांमध्ये उत्साहात पार पडला.
या प्रचार दौर्याची सुरुवात दुपारी १२ वाजता गणेशनगर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने झाली

त्यानंतर प्रभातनगर, डॉ. आंबेडकरनगर, देगाव चाळ, सिद्धार्थनगर, सिडको रॅली, वसरणी आदी भागांमध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. सायंकाळच्या सत्रात खोब्राडेनगर कमान, राजनगर, जयभीमनगर, लेबर कॉलनी, ताडी बु. (अरुणोदय नगर) तसेच सांगवी बु. या भागांमध्ये सभा व रॅलीद्वारे प्रचार करण्यात आला.
प्रचारादरम्यान सुजात आंबेडकर यांनी शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, रोजगार आणि सर्वांगीण विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. नागरिकांकडून ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या प्रभागाचा, वस्तीचा, गल्लीचा, वॉर्डाचा आणि संपूर्ण शहराचा विकास करायचा असेल तर आपल्या हक्काचे, काम करणारे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून देणे गरजेचे आहे.”
या प्रचार दौर्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून, नांदेड शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
