
महाड (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या वतीने महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी चवदार तळे येथे बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांच्या स्वागतार्थ भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या स्वागत समारंभास रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व अनुयायी यांच्या मनात समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ झाली.
महाड येथील क्रांतीभूमी चवदार तळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्याय व अस्पृश्यतेविरुद्ध उभारलेल्या ऐतिहासिक मानवी हक्कांच्या सत्याग्रहाचे प्रतीक असून, आजही लाखो अनुयायांना प्रेरणा देत आहे.

या उत्कृष्ट आयोजनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या आयोजकांचे रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.




