
दिल्ली येथे भंते संघरत्न व भंते विनाचार्य यांची बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट
दिल्ली/महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आज नवी दिल्ली येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भेट घेतली. या वेळी भंते संघरत्न व भंते विनाचार्य (महाबोधी मुक्ती आंदोलन) उपस्थित होते. या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भेटीत भंतेंनी महाबोधी महाविहारचा ऐतिहासिक संघर्ष, सध्याची परिस्थिती, ब्राह्मणवादी नियंत्रणामुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच पुढील आंदोलनाची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब आंबेडकर यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला स्वतःचा व वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

यापूर्वीही महाराष्ट्रात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तपणे संपूर्ण राज्यात या आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहीम, निदर्शने व जनआंदोलने राबवली होती, याची आठवण यावेळी करून देण्यात आली.
या बैठकीत आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ठामपणे मांडण्यात आल्या.
🔹 BT Act 1949 रद्द करण्यात यावा
🔹 महाबोधी महाविहार ब्राह्मणवादी नियंत्रणातून मुक्त करण्यात यावा
या या आंदोलनाच्या मुख्य मागण्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा ही महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभर आंदोलन करत असून, या बैठकीत पुढील टप्प्यातील आंदोलन, व्यापक जनआंदोलन उभारणी, तसेच कायदेशीर आणि संसदीय लढ्याबाबत सखोल चर्चा झाली.
महाबोधी महाविहार हा बौद्धांचा पवित्र तीर्थस्थळ असून त्याचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडेच असावे, ही बाब संविधानिक, ऐतिहासिक व नैतिक दृष्टिकोनातून योग्य असल्याचे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात हा लढा अधिक तीव्र आणि व्यापक करण्यात येईल, असा निर्धार या भेटीतून व्यक्त झाला.