हिंगोली, प्रतिनिधी —
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत २६ नोव्हेंबर रोजी “संविधान गौरव दिन” हिंगोली जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त The Buddhist Society of India व भारतीय बौद्ध महासभा, हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने शहरातून भव्य “संविधान रॅली” काढण्यात आली.
रॅलीसाठी विशेष प्रकारे सजविलेल्या वाहनावर भारताचे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. “भारत का संविधान – हमारा अभिमान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान संविधानाची प्रस्तावना, मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला नागरिक, युवक-युवती, बौद्ध उपासक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, समानता व बंधुता जपण्याचा संदेश देत रॅली शांततेत व शिस्तबद्धरीत्या पार पडली.

