स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांसोबत साजरा; ॲड. अण्णासाहेब मोहन यांच्याकडून फलआहार व अल्पआहाराची मेजवानी


 

अहमदनगर प्रतिनिधी – सुनिल वाघमारे 

 

सराला (ता. श्रीरामपूर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत सराला यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव ॲड. अण्णासाहेब भागवत मोहन यांच्या पुढाकारातून व सौ. सारिका मोहन यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फलआहार व अल्पआहाराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचा आनंद लुटण्याचा हा उपक्रम कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत गावचे सरपंच शंकर विटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्या तसेच प्रमुख पाहुण्यांनी एकत्रितपणे अल्पआहाराचा आस्वाद घेतला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. अण्णासाहेब मोहन म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहणाचा कार्यक्रम नसून प्रत्येक भारतीयासाठी आनंद, अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसोबत हा आनंद साजरा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हीच या उपक्रमाची खरी पावती आहे.”

गावातील सामाजिक कार्यकर्ते रफिकभाई सय्यद, महिला बचत गटाच्या ग्रामसखी सौ. सारिका मोहन तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मथुराम पवार यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त करून उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आसने मॅडम व सहशिक्षक जगताप सर यांनी विशेष परिश्रम घेत विद्यार्थ्यांचे भाषणे, कवायत, मानवी मनोरे उभारून राष्ट्रध्वजाला सलामी यांसह विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांमुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण लाभले.

कार्यक्रमाला गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम उपस्थित होती. अध्यक्ष प्रवीण दिवे, उपाध्यक्ष अमर मोहन, सुनील भालेराव, शिवाजी रहाटवाडे, लतीफभाई शेख, अनिकेत मोहन, स्वराज मोहन, अन्वर शेख, इमरान शेख आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वरपाटील वेताळ, प्रगतिशील शेतकरी सुभाषदादा उंदरे, सुनीर शेख मिस्तरी, संभाजीभाऊ उबाळे, बाळासाहेब उबाळे मामा, आचारी थोरात मामा, राजू शेख, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब मोहन, आशा सेविका अंजुताई मोहन, अंगणवाडी सेविका भालेराव ताई यांच्यासह विद्यार्थी, पालक व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

विद्यार्थ्यांसाठी फळाहार व अल्पाहाराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शाळा समिती, मुख्याध्यापिका व सरपंच यांच्या हस्ते ॲड. अण्णासाहेब मोहन यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटून घेण्याचा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

 

दरम्यान, पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भोजनाचा उपक्रम राबविण्याची जबाबदारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मथुराम पवार यांनी स्वीकारली. याबद्दल त्यांचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

दरवर्षी स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याचा मानस यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ॲड. अण्णासाहेब मोहन यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांसह ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.


Leave a Comment

error: Content is protected !!