कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
डोंबिवली : जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये विद्यार्थी व युवक संघटनांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हातात फलक घेत विद्यार्थी एकता व युवा एकतेचा संदेश देत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली.

आंदोलनादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या फलकावर “विद्यार्थी एकता, युवा एकता जिंदाबाद” असा संदेश देण्यात आला होता. तसेच शैक्षणिक सुधारणा आणि सर्वांसाठी मोफत, समान व वैज्ञानिक शिक्षण या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या वेळी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.