
ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे
दरवर्षी १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ डॉक्टरांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून, समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलविण्यासाठी, त्याला नवजीवन देण्यासाठी आणि संकटाच्या क्षणी आधार देण्यासाठी डॉक्टर अहोरात्र कार्यरत असतात.
रुग्णालयाच्या दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी डॉक्टर हे आशेचे किरण असतात. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनेक अडचणी आणि ताणतणाव सहन करून ते आपले कर्तव्य पार पाडतात. कोरोना महामारीसारख्या कठीण काळात डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता केलेली सेवा संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
डॉक्टर हे केवळ औषधोपचार करणारे तज्ज्ञ नसतात, तर ते समाजाला निरोगी आणि सशक्त बनविणारे शिल्पकार असतात. त्यांच्या ज्ञानामुळे, अनुभवामुळे आणि सेवाभावामुळे लाखो लोकांना नवजीवन मिळते. त्यामुळेच समाजात डॉक्टरांना देवदूताची उपमा दिली जाते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक आरोग्याला विशेष महत्त्व दिले. निरोगी समाजाशिवाय देशाचा विकास शक्य नाही, हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हीच खरी मानवसेवा असल्याचा संदेश त्यांच्या कार्यातून दिसून येतो.
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त देशातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्यसेवक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
“रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालणारे हात, संकटात आशेचा किरण बनणारे व्यक्तिमत्त्व आणि मानवतेची सेवा हेच ज्यांचे ध्येय — त्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“पांढऱ्या कोटातील देवदूतांना राष्ट्राचा सलाम; राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त सेवाभावाला मानाचा मुजरा!”