आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात परतूर येथे आज भव्य मोर्चा; हजारोंच्या उपस्थितीचे आवाहन


परतूर | प्रतिनिधी दिपक नाटभजन

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज (दि. १ जून २०२६) परतूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने बहुजन समाजाला दिलेल्या आरक्षण हक्काच्या संरक्षणासाठी आणि आरक्षणावरील कथित धोक्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

मोर्चा सकाळी १० वाजता संविधान चौक, रेल्वे स्टेशन परिसर येथून सुरू होऊन तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध, आंबेडकरी आणि बहुजन समाजातील नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयोजकांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आरक्षणाची तरतूद मिळवून दिली. त्यामुळे आरक्षणावरील कोणत्याही प्रकारच्या गदा किंवा उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात समाजाने एकजूट दाखविण्याची गरज आहे.

“सैनिक हो भीमाचे, भीमराव आठवा रे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हा रे” या घोषवाक्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आरक्षण व संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परतूर शहरात आंबेडकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध बहुजन संघटनांकडून जनजागृती करण्यात येत असून परिसरात मोर्चाबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोर्चाची माहिती :

दिनांक : १ जून २०२६

 वेळ : सकाळी १० वाजता

 प्रारंभ ठिकाण : संविधान चौक, रेल्वे स्टेशन, परतूर

-समारोप : तहसील कार्यालय, परतूर

मोर्चात सहभागी होऊन आरक्षण आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!