नांदेडमध्ये ‘ऑनर किलिंग’; प्रियकराची हत्या, प्रियसीने मृतदेहासोबत केले विवाह


नांदेड :प्रतिनिधी): प्रेमसंबंधांना विरोध करत मुलीच्या वडील व भावाने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात समोर आली आहे. प्रियकराच्या हत्येनंतर प्रियसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह करत समाजाला हादरवणारा निर्णय घेतला. “माझ्या वडिलांनी आणि भावाने माझ्या प्रियकराला मारले, पण ते हरले; माझा प्रियकर मरूनही जिंकला,” असे म्हणत प्रियसीने टाहो फोडला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी तिने केली आहे.

इटवारा परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. सक्षम ताटे (रा. नांदेड) याची आंचल मामिडवार हिचे वडील गजानन मामिडवार व त्यांच्या साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सक्षम व आंचल हे विवाहबद्ध होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी त्यावरून राग व्यक्त करत सक्षमवर गोळीबार केला आणि नंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारांपूर्वी आंचलने सक्षमच्या मृतदेहाला हळद-कुंकू लावून विवाह केला. “माझे प्रेम हिरावून घेतले गेले, पण मी माझा निर्णय बदलणार नाही,” असे म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

या प्रकरणी पोलिसांनी वडील गजानन मामिडवार यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले असून वडील व दोन भावांसह इतरांवर इटवारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

 

घटनेमुळे नांदेड शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून ‘ऑनर किलिंग’सारख्या अमानवी प्रथांविरोधात कठोर कायदे व त्वरित न्यायाची मागणी जोर धरत आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!