
येडशी तांडा आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – वंचित बहुजन आघाडीचा निषेध; शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी!
📍 ता. कळमनुरी:
कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक आश्रमशाळा (मुलींचे वसतिगृह) येथे अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 13 ऑक्टोबर 2025 रोजी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकांनी मुलीवर दबाव आणत घटना लपविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
मात्र, पीडित मुलीच्या पालकांनी वेळीच धाडस दाखवत हा प्रकार उघडकीस आणला. प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पालकांनी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांची भेट घेऊन न्याय मागितला.
राजू कांबळे यांनी पालकांना संपूर्ण साथ देण्याचे आश्वासन देत म्हटले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी लावण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द केली जाईल. वंचित बहुजन आघाडी पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून नागरिकांनी संबंधित शाळेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.




