
ठाणे प्रतिनिधी:- माया खिल्लारे
२० जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच संविधानिक मूल्ये, लोकशाही हक्क आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, आंबेडकरी आणि संविधानवादी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मते, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेली कारवाई ही चिंताजनक असून संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांचे रक्षण करण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यभरात “संविधान वाचवा, लोकशाही वाचवा” या घोषणांनी वातावरण भारावून गेले आहे.
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच संविधानिक मूल्यांचे रक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र बंदच्या आवाहनाच्या माध्यमातूनही लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदविण्याचे आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बैठका, जनजागृती मोहीम आणि संघटनात्मक तयारी सुरू असून या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नागरिकांनी शांतता, संयम आणि कायदा-सुव्यवस्था राखून लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
“लोकशाही वाचवा, संविधान वाचवा”
ही केवळ घोषणा नसून भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या संरक्षणासाठीची सामूहिक हाक असल्याचे मत आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.