“बाबासाहेबांच्या लेखणीतून जन्मलेला ‘मूकनायक’ : १०६ वर्षांचा संघर्षशील प्रवास”


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना, दुःख आणि विद्रोह व्यक्त करण्यासाठी १९२० साली मराठी भाषेतील ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित झाला.

आज त्या ऐतिहासिक क्षणाला १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
मूकनायकच्या पहिल्या अंकातील ‘मनोगत’ हा अग्रलेख स्वतः बाबासाहेबांनी लिहिला होता आणि पुढील तेरा अंकांतही त्यांनी सातत्याने लेखन केले. मूकनायकसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत दिली, हे या चळवळीचे ऐतिहासिक बळ होते.

मूकनायकचा मुख्य उद्देश दलित, गरीब, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा सरकारपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. बाबासाहेबांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत व अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला थेट आव्हान दिले.
अस्पृश्य समाजाचा उद्धार आणि विकास होण्यासाठी राजकीय सत्ता आणि शैक्षणिक ज्ञान मिळवणे अत्यावश्यक आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
आज बहुजन-दलित समाज मोठ्या प्रमाणावर शिक्षित झाला आहे. माध्यमांचे स्वरूप बदलले आहे, पण माध्यमांची गरज संपलेली नाही, ती अधिक तीव्र झाली आहे.

बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत ही नियतकालिके चालवली. कारण त्यांना माध्यमांची ताकद माहीत होती.

आज छपाई, वितरण, खर्च आणि व्यवस्थापनाची प्रचंड आव्हाने असतानाही आपण बाबासाहेबांचे ‘प्रबुद्ध भारत’ हे पाक्षिक जिवंत ठेवले आहे.
प्रबुद्ध भारत हा आपल्या सर्वांचा आवाज बनून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे.
मूकनायकच्या १०६ वर्षांच्या निमित्ताने माझे सर्व जनतेला आवाहन आहे.

येत्या ४ फेब्रुवारीला प्रबुद्ध भारतचा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी प्रबुद्ध भारत या पाक्षिकाचे सभासद होऊया. घरोघरी, गावोगावी वर्गणी भरून हा अंक पोहोचवूया आणि बाबासाहेबांनी दिलेला हा अमूल्य ठेवा जतन करूया.
आपले हक्काचे, निर्भीड आणि लढाऊ माध्यम आपणच उभे करूया.

मूकनायकच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन!
Hedlain


Leave a Comment

error: Content is protected !!