३२ वा मराठवाडा नामविस्तार वर्धापनदिन मुदखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा


मुदखेड / प्रतिनिधी : प्रकाश गवारे

मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरी चळवळीतील धगधगता आणि क्रांतीकारी इतिहासाचा सुवर्णअध्याय आहे. अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या या ऐतिहासिक संघर्षात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा लढा जरी लाक्षणिक अर्थाने भूतकाळात सामावलेला असला, तरी त्याची प्रेरणा आजही वर्तमानात जिवंत असून भावी पिढ्यांना सदैव उर्जा देणारा अखंड उर्जास्त्रोत ठरतो आहे.

या संघर्षात जिवाची बाजी लावून लढलेल्या आणि शहीद झालेल्या ज्ञात-अज्ञात सर्व भिमसैनिकांना समता सैनिक दलाच्या वतीने विनम्र अभिवादन व सलामी अर्पण करण्यात आली.

दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, तालुका मुदखेड यांच्या वतीने ३२ वा मराठवाडा नामविस्तार वर्धापनदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पूज्य भदंत गगनबोधी भंतेजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत निखाते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अविनाश चौदंते, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस नागोराव लोखंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. जी. चौदंते, समता सैनिक दल प्रशिक्षक सुनील चौदंते, सेवानिवृत्त सैनिक देविदास पवार, मोहन सावते, एकनाथ तारु आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव, उपासक व उपासिका उपस्थित होते.

समता सैनिक दलाच्या वतीने मराठवाडा नामांतर लढ्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. शिस्तबद्ध उपस्थिती, गणवेशातील समता सैनिक दलाचे जवान हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

पूज्य भदंत गगनबोधी भंतेजी यांच्या बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र, मुदखेड विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पंचरंगी धम्मध्वज व निळ्या ध्वजास तसेच नामांतर आंदोलनातील शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.

अत्यंत शिस्तबद्ध, भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. मराठवाडा नामविस्ताराच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण जागवून सामाजिक चळवळीला नवी दिशा देणारा हा वर्धापनदिन ठरला.


Leave a Comment

error: Content is protected !!