
नांदेड | प्रतिनिधी
विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले होते. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव-नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मे व २१ मे रोजी भव्य धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ मे रोजी गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते डॉ. गगन मलिक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच २१ मे रोजी महान त्यागी पुज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांचे धम्म प्रवचन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाश कुमार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता होणार असून, राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलदादा आन्विकर यांचा बुद्ध-भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी जिल्हा व परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी शुभ्र वस्त्रे परिधान करून दोन्ही दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.