मरखेल पोलिसांनी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला केले अटक.
देगलूर प्रतिनिधी पिंजारी माहेमूद
देगलूर :दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंघ खुनाचा उलगडा करण्यात मरखेल पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास, स्थानिक गुप्त माहिती, साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.रामकिशन गंगाधर गोलेवार (रा. आमदापूर, ता. देगलूर) हे २५ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नी दैवशाला रामकिशन गोलेवार यांनी १७ मे रोजी मरखेल पोलीस ठाण्यात पती वेपत्ता असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार मिसिंग क्रमांक ०६,२०२६ दाखल करण्यात आला. मात्र मिसिंगची माहिती तब्बल २५ दिवस उशिराने देण्यात आल्याने तसेच पतीच्या शोधासाठी अपेक्षित प्रयत्न करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान देवशाला गोलेवार हिचे गावातील सुभाष व्यंकन्ना यत्तरवाड याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. या संबंधांवरून रामकिशन गोलेवार व त्यांच्या पत्नीमध्ये वाद होत असल्याचेही उघड झाले.मरखेल पोलिसांनी दोन्ही संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासले असता त्यांच्यात नियमित संपर्क असल्याचे दिसून आले. मात्र मिसिंग प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचा संपर्क अचानक बंद झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच सुभाष यत्तरवाड हा दैवशालाच्या मुलाशी संपर्क साधत असल्याचेही तपासात समोर आले. याशिवाय रामकिशन गोलेवार यांनी एप्रिल महिन्यापासून त्यांची पेन्शनची रक्कमही काढलेली नसल्याचे आढळून आले. या सर्व बाबींची सांगड घालत पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.चौकशी आणि उपलब्ध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे समोर ठेवल्यानंतर देवशाला गोलेवार हिने अखेर पतीचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. तसेच मृतदेह शेतात पुरल्याचेही सांगितले. तिच्या कबुलीनंतर कार्यकारी
दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी उत्खनन करण्यात आले असता मानवी सांगाडा व अन्य अवशेष हस्तगत करण्यात आले. घटनास्थळी मिळालेल्या कपड्यांवरून नातेवाईकांनी मृताची प्राथमिक ओळख पटविली असून डीएनए नमुनेही जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी हणमंत गंगाधर गोलेवार यांच्या फियार्दीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३, २३८ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दैवशाला गोलेवार हिला आमदापूर येथून ताब्यात घेण्यात आले असून, दुसरा आरोपी सुभाष व्यंकन्ना यत्तरवाड याला तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबईतील भायंदरपाडा-नागलाबंदर परिसरातून अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोणताही मृतदेह उपलब्ध नसताना केवळ संशयास्पद परिस्थिती, तांत्रिक विश्लेषण, मानवी गुप्त माहिती आणि सखोल तपासाच्या आधारे अंध खुनाचा उलगडा करण्यात यश आल्याने मरखेल पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




