ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे
११ मार्च हा दिवस मराठा इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि तितकाच अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रम, विद्वत्ता आणि अदम्य धैर्याचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच शौर्य, बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुण दाखवले. त्यांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी मोगल, पोर्तुगीज आणि इतर शत्रूंशी सतत संघर्ष केला. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे मोगल सम्राट औरंगाझेब याला मराठ्यांचा पराभव करणे अत्यंत कठीण झाले होते.
१६८९ मध्ये संगमेश्वर येथे मोगल सैन्याने संभाजी महाराजांना कपटाने पकडले. त्यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला, परंतु शंभूराजांनी मृत्यू पत्करला पण धर्म आणि स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. तब्बल ४० दिवस त्यांच्यावर क्रूर छळ करण्यात आला आणि अखेरीस ११ मार्च १६८९ रोजी त्यांची निर्दयी हत्या करण्यात आली.
शंभूराजांचे बलिदान हे केवळ एका राजाचे नव्हे, तर धर्म, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान मानले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्याची ज्वाला विझली नाही, उलट ती आणखी प्रखर झाली आणि औरंगजेबाचे स्वराज्य संपवण्याचे स्वप्न चुराडा झाले.
आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर शंभूराजे बलिदान दिन श्रद्धा, अभिमान आणि कृतज्ञतेने साजरा केला जात आहे. त्यांच्या शौर्यगाथा आजही तरुणांच्या रक्तात स्वाभिमानाची ज्वाला पेटवतात.
धर्मासाठी मरण पत्करले पण कधीही झुकले नाहीत – *अशा सिंहासारख्या योद्ध्याला कोटी कोटी प्रणाम!*
