धाराशिवमध्ये पुतळा वाद पेटला; शिवराय–आंबेडकरांच्या विचारांना तडा देणारी घटना, जनतेला एकत्र येण्याचे आवाहन


पनवेल प्रतिनिधी – किशोर आदमने

धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या नावावरून वाद निर्माण होणे, ही अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी बाब मानली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना सर्व समाजघटकांना एकत्र आणत एकतेचा आदर्श घालून दिला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पायाभरणी करत प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळवून दिले. या दोन्ही महामानवांचे कार्य समाजाला एकत्र आणणारे आहे, विभाजन करणारे नाही.

अशा परिस्थितीत त्यांच्या अनुयायांनी वादाच्या मार्गावर न जाता, एकमेकांचा सन्मान राखत शांततेचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे. धाराशिवमधील नागरिकांनी संयम बाळगत, तणाव टाळून हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, असे आवाहन होत आहे.

समाजात तणाव निर्माण करण्याऐवजी ऐक्य, बंधुता आणि परस्पर आदर जपणे हीच खरी काळाची गरज आहे. महाराष्ट्राची एकजूट अबाधित ठेवणे आणि महान विचारांची परंपरा जपणे, हीच दोन्ही महामानवांना खरी अभिवादन ठरेल.


Leave a Comment

error: Content is protected !!