
नांदेड | प्रतिनिधी : प्रकाश गवारे
भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा नांदेड-उत्तर यांच्या वतीने समता सैनिक दल भरतीपूर्व नावनोंदणी व एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी मातोश्री रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींसह महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे २०० जणांनी सहभाग नोंदवला. सहभागी युवक-युवतींना संघटनात्मक शिस्त, शारीरिक तयारी, सामाजिक बांधिलकी तसेच समता सैनिक दलाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण शिबिरासाठी लेफ्टनंट कर्नल किरण साबळे (सोलापूर) तसेच लेफ्टनंट कर्नल संतोष दुंडे (नांदेड दक्षिण) यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून युवक-युवतींना प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान भंतेजी शिलरत्न थेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वज व समता सैनिक दलाचा ध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे यांनी समता सैनिक दलाच्या जवानांना शिक्षण व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे युवकांमध्ये शिस्त, संघटनभावना आणि सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश कोकरे यांनी केले.
या प्रशिक्षण शिबिराला परिसरातील अनेक कार्यकर्ते, समाजबांधव व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.




