
ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे
आज देशभरात महान मौर्य सम्राट सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात येत आहे. मानवतेचा संदेश देणारे, अहिंसा आणि समतेचे तत्त्व जगाला शिकवणारे अशोक हे भारतीय इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व मानले जातात.
इ.स.पूर्व 304 मध्ये जन्मलेल्या अशोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतीय उपखंडात केला. ते चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आणि बिंदुसार यांचे पुत्र होते. पराक्रमी आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर राज्यकारभार केला.
मात्र, त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला तो कलिंग युद्ध. या युद्धात झालेल्या प्रचंड रक्तपातामुळे अशोकांच्या मनात खोलवर पश्चात्ताप निर्माण झाला. यानंतर त्यांनी युद्धाचा मार्ग सोडून अहिंसा आणि शांततेचा स्वीकार केला.
यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून “धम्म” या तत्वज्ञानाचा प्रसार केला. सत्य, करुणा, समता आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित शासन त्यांनी उभं केलं. त्यांनी उभारलेले शिलालेख आणि स्तंभ आजही त्यांच्या विचारांची साक्ष देतात.
अशोक जयंतीनिमित्त आज विविध ठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, व्याख्याने आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात शांतता, एकता आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
सम्राट अशोक यांचे जीवन हे परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा स्वीकार करून समाज अधिक सुसंवादी आणि समताधिष्ठित बनवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




