
ता.कंधार : गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे, या विचारातून लाट खुर्द(ता. कंधार) येथील युवकांनी सुरू केलेल्या ‘एक रविवार गावासाठी’ या अभिनव उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी ग्रामस्थ एकत्र येत श्रमदानातून गावाची स्वच्छता करण्याबरोबरच विविध आवश्यक कामे करीत असल्याने या उपक्रमातून गावाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत लाट खुर्द येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाला लोकसहभागाची जोड देत गावातील युवकांनी दि.२३ ऑगस्ट रोजी ‘एक रविवार गावासाठी’ या संकल्पनेची सुरुवात केली.
या उपक्रमांतर्गत दर रविवारी युवक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील नागरिक एकत्र येऊन गावातील विविध भागांची स्वच्छता करीत आहेत. कचरा व अस्वच्छता दूर करण्यासोबतच धूरफवारणी, तणनाशक फवारणी, नाल्यांची सफाई, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, रस्त्यालगतची झाडे व परिसराची स्वच्छता तसेच गावासाठी आवश्यक असलेली इतर कामे श्रमदानातून केली जात आहेत.या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थ केवळ श्रमदानच करीत नसून वेळ, आर्थिक मदत तसेच जेसीबी आणि ट्रॅक्टर यांसारखी यंत्रसामग्रीही स्वयंस्फूर्तीने उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी ही केवळ ग्रामपंचायतीची नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
युवकांच्या पुढाकाराला ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांची मिळालेली साथ ही या चळवळीची मोठी ताकद ठरत आहे. लोकसहभागातून सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ सातत्याने सुरू राहिल्यास गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यास निश्चितच मदत होणार आहे.
लाट खुर्द गावाने सुरू केलेल्या ‘एक रविवार गावासाठी’ या उपक्रमाचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यावा. ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून आपापली गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे यांनी केले