
परभणी : परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरणामध्ये चांगलीच रंगत आली आहे. आज परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील विविध भागांत घेतलेल्या जाहीर सभांमधून त्यांनी वंचित-शोषित समाजाला सत्तेचे वाटेकरी होण्याचे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारांना आवाहन केले.
पेठपिंपळगाव ते उखळीपर्यंत प्रचाराचा धडाका
सुजात आंबेडकर यांनी पेठपिंपळगाव (ता. पालम), माकणी (ता. गंगाखेड) आणि उखळी (ता. सोनपेठ) या भागांत जाहीर सभा घेतल्या. या सभांना मोठ्या संख्येने मतदार व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. प्रत्येक सभेतून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत वंचित बहुजन आघाडीचा विकासनिष्ठ अजेंडा ठामपणे मांडला.

केवळ घोषणाबाजी न करता, सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून गाव आणि गट पातळीवरील विकासाची ठोस रूपरेषा मांडली. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी पुढील मुद्दे अधोरेखित केले –
– ग्रामीण भागातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि दर्जेदार शिक्षणाचा अभाव
– स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधा
– बळीराजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्याचा निर्धार
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित-शोषित समाज सत्तेत बसावा यासाठी आयुष्य झोकून दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. आपला विकास दुसऱ्याच्या भरवशावर न ठेवता सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्या आणि आपल्या गावाचा कायापालट करा,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रचार सभांदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसिकर, परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष मनोहर वावळे, तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी, स्थानिक उमेदवार आणि मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या जाहीर सभा नागरिकांनी घोषणांनी दणाणून सोडला.
सुजात आंबेडकर यांच्या दौऱ्यामुळे परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.





