वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक


अहिल्यानगर : भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे तहसीलदार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने उमाताई जाधव, संतोष भोसले यांच्यासह विविध समाज प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

बैठकीत पारनेर तालुक्यातील उदजिरा येथील मदारी समाजासंदर्भातील गंभीर प्रश्न मांडण्यात आला. संबंधित समाज परप्रांतीय असल्याचे सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेल्या वादाची सविस्तर माहिती प्रशासनासमोर मांडण्यात आली. या प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दखल घेतल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 

 

यावेळी अजित भोसले, राहुल भोसले, सुरेश काळे, सचिन काळे, रामसिंग भोसले, बशीर मदारी, रोशन मदारी, जकीर मदारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या मूलभूत प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत केले. भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

 

तसेच आगामी काळात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. बैठकीत शिक्षण, निवास, जातप्रमाणपत्र, ओळखपत्रे, शासकीय योजनांचा लाभ आणि समाजाच्या पुनर्वसनासंबंधी विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासन आणि समाज प्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Leave a Comment

error: Content is protected !!