
नांदेड : ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्यावतीने २० मे रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सदर निवेदनात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची सखोल चौकशी व्हावी. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा. या घोटाळ्यात सहभागी सर्व सूत्रधार, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करावी. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी. या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांना किमान तीन वर्षासाठी नीट परीक्षेला बसण्यास बंदी घालावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मुन्तजीब देशमुख, तुषार देशमुख, सुनील कदम, प्रबुध्द चित्ते, मोहम्मद जाहेद, कैलास वाघमारे, अंकुश सावते, उसामा खतीब, फरहान देशमुख, अझहर शेख, कुणाल भूजबळ, पवन जगडमवार आदीसह विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.




