नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप


नांदेड येथे दि. १४ एप्रिल रोजी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविण्यात आली.

या वेळी उपस्थित नागरिकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात स्वाक्षऱ्यांद्वारे निषेध व्यक्त केला. मोहिमेदरम्यान विविध आशयाचे पोस्टर आणि फलक पाहण्यास मिळाले. “उपवर्गीकरण म्हणजे आरक्षणाची हत्या नाही काय?”, “ज्यांची संख्या कमी, त्यांना आरक्षणाची नाही हमी”, “अनुसूचित जातीत फूट पाडणारे उपवर्गीकरण हटाव, आरक्षण बचाव” तसेच “अ, ब, क, ड उपवर्गीकरण हाणून पाडा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

तसेच, काही कार्यकर्त्यांनी “उपवर्गीकरण हटवा, आरक्षण बचाव” असे फलक हातात घेत जनजागृती केली. उपस्थित नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग नोंदविला.

विविध आंबेडकरवादी संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्र येत या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येणार असून, पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर केली जाईल.


Leave a Comment

error: Content is protected !!