
नांदेड प्रतिनिधी:-प्रकाश गवारे
श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव नांदुसा (ता. जि. नांदेड) यांच्या वतीने १४६ व्या जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भव्य महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

पदयात्रेत १४६ फूट लांबीचा पंचशील बौद्ध धम्म ध्वजास समता सैनिक दल यांच्या वतीने सलामी देण्यात आली आहे.
ही महापदयात्रा श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव नांदुसा येथून प्रारंभ होऊन नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.

पंचशील बौद्ध धम्मध्वजाचे प्रतीकात्मक अर्थ
बौद्ध धम्मध्वज पाच प्रमुख रंगांनी बनलेला असून प्रत्येक रंगाचा स्वतंत्र व गहन अर्थ आहे—
निळा रंग : समानता व व्यापकतेचे प्रतीक
पिवळा रंग : पवित्रता व करुणेचे प्रतीक
लाल रंग : गतिशीलता व दृढ संकल्पाचे प्रतीक
पांढरा रंग : शांती व शुद्धतेचे प्रतीक
केशरी (नारंगी) रंग : त्याग व सेवेचे प्रतीक

या पंचतत्त्वांच्या समन्वयातूनच बौद्ध धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे.
बौद्ध धम्मध्वजाचा इतिहास
बौद्ध धर्मातील प्रत्येक धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वजास पंचशील ध्वज असे म्हटले जाते. पंचशील ध्वजाचा जन्म श्रीलंका येथे झाला.
इ.स. १८८० मध्ये बौद्ध धर्माचे अमेरिकन पाठीराखे कर्नल हेनरी स्टील ओलकोट श्रीलंकेत आले. त्यांनी बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले.
इ.स. १८८८ साली वैशाख पौर्णिमेला श्रीलंकेतील प्रसिद्ध कोतोहोन महाविहारात प्रथम पंचशील ध्वज फडकविण्यात आला. कर्नल ओलकोट व जे. आर. डी सिल्वा यांच्या सहकार्याने पंचशील ध्वजाची संकल्पना प्रत्यक्षात आली. त्यामुळे कर्नल ओलकोट यांना पंचशील ध्वजाचे जनक मानले जाते..

इ.स. १९५० मध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध बंधुत्व संघाने या ध्वजाला अधिकृतपणे बौद्ध ध्वज म्हणून मान्यता दिली. आज हा धम्मध्वज जागतिक बौद्ध एकतेचे प्रतीक बनला आहे.
हजारोंची उपस्थिती, विविध मान्यवरांचा सहभाग
या महापदयात्रेत आयोजक भदंत पंय्याबोध्दी थेरो, भंतेजी शिलरत्न थेरो, तसेच भिक्षू संघ व भिक्षुणी संघ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यासह समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी, समाजबांधव, विविध राजकीय पक्षांचे नेते, तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, उपासक-उपासिका आणि लहान बालक-बालिका असे हजारो नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते.
महापदयात्रेचा मार्ग
खुरगाव – पासदगाव – नेरली फाटा – भावसार चौक – तरोडा नाका – राज कॉर्नर – आय.टी.आय. असा महापदयात्रेचा मार्ग होता.
या दरम्यान महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला भदंत पंय्याबोध्दी थेरो, भदंत शिलरत्न थेरो व भिक्षू संघाच्या वतीने पुष्प समर्पण करून वंदन करण्यात आले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समारोप
पूर्ण विडिओ पहा 👇https://youtu.be/KDrqCViR-kM?si=hc_Gccw97FKOMQzN
नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर भदंत पंय्याबोध्दी थेरो यांनी उपस्थित जनसमुदायाला त्रिसरण व पंचशील प्रदान केले. सर्व उपस्थितांचे आभार मानून या जागतिक धम्मध्वज महापदयात्रेचा भव्य समारोप करण्यात आला.




