
जालना प्रतिनिधी: प्रदीप जाधव
(जालना) भोकरदन— तालुक्यातील खडकी परिसरात महिला मजुरावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हसनाबाद पोलीस ठाण्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

प्राथमिक माहितीप्रमाणे, संबंधित महिला मजूर कामानिमित्त परिसरात राहत होती. या दरम्यान मुकादम म्हणून काम करणाऱ्या शरद शिवाजी राऊत यांनी अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तथापि, ही घटना एका व्यक्तीचे कृत्य नसून इतर आरोपी देखील सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्यांनी “इतर सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सखोल चौकशी करावी” अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच गृहराज्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महिला आयोगानेही तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तपास वेगात सुरू असल्याची माहिती हसनाबाद पोलिसांनी दिली.
