
सामाजिक भान जपत शिक्षण घेणारा एक युवक वंचित समाजातील कष्ट अनुभवून “मी समाजासाठी काहीतरी करेन” या भावनेने जीवनात संघर्ष करणारा युवक म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी. दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी मनुवादी व जातीय द्वेषातून पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली.
वकिली शिक्षण घेत असलेल्या सोमनाथचा गुन्हा काय होता? तर संविधानाची झालेली विटंबना पाहून संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करणे. वडार समाजातील तरुण असून शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्कांची व अधिकारांची जाणीव असलेला, सुशिक्षित आंबेडकरवादी युवक हेच मनुवादी पोलिसांना खटकले. परिणामी पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करून सोमनाथचा खून करण्यात आला.
सरकार व पोलिस प्रशासन पूर्णपणे आरोपी पोलिसांना वाचवण्यासाठी काम करत होते. सोमनाथचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाला, असे सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात वक्तव्य करत होते. पोलिस प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हे सर्व उघडकीस आणण्याचे काम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

शवविच्छेदनापासून ते अंत्ययात्रेपर्यंत, सूर्यवंशी कुटुंबाला आर्थिक मदत, खंबीर पाठिंबा आणि आरोपींच्या विरोधात निडरपणे लढा देण्याचे काम करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता या लढ्यात सहभागी होता.
विजयाबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केस दाखल करून औरंगाबाद उच्च न्यायालयात आरोपींवर गुन्हे दाखल करायला भाग पाडले. याच्या विरोधात सरकार आरोपी पोलिसांना वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र तेथेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथच्या न्यायाची बाजू भक्कमपणे मांडली आणि आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल झाले.

हा लढा शासन, पोलिस प्रशासन आणि मनुवादी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. आज सोमनाथ सूर्यवंशी यांचा प्रथम स्मृतिदिन आहे आठवण त्या संघर्षाची, आंदोलनाची, संविधानाप्रती असलेल्या प्रेमाची आणि कर्तव्यनिष्ठेची.

जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना पूर्ण न्याय मिळत नाही आणि आरोपी पोलिसांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा हा लढा सुरूच राहील.