नांदेड | प्रतिनिधी
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांनी जर शंभर टक्के मतदान केले, तर वंचित बहुजन आघाडी–काँग्रेस युतीचे पूर्ण पॅनल निवडून येईल, असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

ते नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करताना सांगितले की, नांदेडमध्ये जुलमी आणि कौटुंबिक सत्तेचा विळखा निर्माण झाला असून, वेगवेगळ्या पक्षांतून बहुरूपी पद्धतीने उमेदवार उभे केले जात आहेत.

या बहुरूपी राजकारणाचा पराभव करण्यासाठीच नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर म्हणाले की, “अशोक चव्हाणांची जुलमी सत्ता संपवायची असेल, तर नांदेड महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी–काँग्रेस युतीची सत्ता आणणे आवश्यक आहे.

ही निवडणूक नांदेडच्या भवितव्याची दिशा ठरवणारी आहे.”
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “नांदेडमध्ये कौटुंबिक राजकारणातून मुक्त श्वास घ्यायचा असेल आणि समता व संविधान सुरक्षित ठेवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.”
या नेत्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे नांदेड महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी–काँग्रेस युतीच्या प्रचाराला वेग आला असून, फुले–शाहू–आंबेडकरवादी मतदारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.