वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी


(जालना प्रतिनिधी )

जालना : शहरातील अंबड चौफुली, मंठा बायपास रोड येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात सोमवारी (३० मार्च) विशेष ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. बोरगाव (ता. जि. जालना) ग्रामपंचायत आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दरबारात घरकुल योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात आले.

अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जालना पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे गृहनिर्माण अभियंता आसीफ शेख यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी समजून घेतल्या.

रखडलेले हप्ते तात्काळ जमा होणार

पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना आणि इतर विविध शासकीय घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र खरात, तालुका महासचिव वैभव वानखेडे, वैजनाथ डोके, उत्तम खरात, वर्षा बाबासाहेब डोके, आनंद लोंढे, सचिन लोंढे, राहुल डोके, संजय डोके, किरण डोके, गौतम पाडमुख, शत्रुघ्न कोळी, रोशन सदावर्ते, गणेश वाहुळे, दत्ता काकडे यांच्यासह बोरगाव परिसरातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


Leave a Comment

error: Content is protected !!