जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना : तालुका जालना येथील उमरी गावामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला पूजनीय भिक्खु रेवत, पूजनीय भिक्खु सत्यबोधी तसेच त्रिपुरा येथील पूजनीय भिक्खु धम्मसेना हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीप, धूप व पुष्प अर्पण करून झाली. त्रिपुरा येथील पूजनीय भिक्खु धम्मसेना यांनी उपस्थित उपासक–उपासिकांना शील प्रदान केले. तर पूजनीय भिक्खु सत्यबोधी यांनी बौद्ध धम्मावर भाष्य करत समाजाने पंचशीलाचे पालन करण्याची आज अत्यंत गरज असल्याचे नमूद केले. धम्म समजून घेण्यासाठी प्रत्येकाने सम्यक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी पूजनीय भिक्खु रेवत यांनी उपासक–उपासिकांना आशीर्वाद देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
उपस्थित भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमादरम्यान धार्मिक आणि शांततामय वातावरण अनुभवास मिळाले.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गांवकरी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.