सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर


मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. 

मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची जबाबदारी UPSC कडे सोपवण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

 

मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखले. यावेळी आंदोलनकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला.

 

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते कमलेश उबाळे म्हणणे की, देशातील परीक्षा व्यवस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विविध परीक्षांमधील गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

 

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे, कमलेश उबाळे, आनंदराज घाडगे, स्वप्नील जवळगेकर, रोहित डोळस, संघर्षा संखद, भूषण पाईकराव, वंचित बहुजन आघाडी मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, सागर गवई, स्नेहल सोहनी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 

 


Leave a Comment

error: Content is protected !!